कधीतरी वेडयागत वागायला हवे
उगाचच रात्रभर जागायला हवे
सुखासीन जगण्याची झाली जळमटे
जगणेच सारे पुरे झाडायला हवे…..कधीतरी वेडयागत वागायला हवे ॥१॥
गारठयात फेकुनिया शाल, कानटोपी
कधीतरी थंडीला वाजायला हवे
छोटे मोठे दिवे फुंकरीने मालवुन
कधीतरी सुर्यावर जळायला हवे…..कधीतरी वेडयागत वागायला हवे ॥२॥
भांडयावर भांडे कधी भिडायला हवे
उगाचच सखीवर चिडायला हवे
मुखातून तिच्यावर पाखडत आग
एकीकडे प्रेमगीत लिहायला हवे…..कधीतरी वेडयागत वागायला हवे ॥३॥
विळीपरी कधी एक चंद्र कोर घ्यावी
हिरवीशी स्वप्ने धारे धारेने चिरावी
कोर कोर चंद्र चंद्र हरता हरता
मनातून पुर्णबिंब तगायला हवे…..कधीतरी वेडयागत वागायला हवे ॥४॥
कधी राति लावुनिया नयनांचे दिवे
पुस्तकाला काहीतरी वाचायला द्यावे
शोधुनिया प्राणातले दुमडले पान
मग त्याने आपल्याला चाळायला हवे…..कधीतरी वेडयागत वागायला हवे ॥५॥
स्वतःला विकून काय घेशील विकत?
खरी खरी सुखे राजा मिळती फुकट
हापापून बाजारत मागशील किती?
स्वतःतच नवे काही शोधायला हवे…..कधीतरी वेडयागत वागायला हवे ॥६॥
तेच तेच पाणी आणि तिच तिच हवा
आणि तुला बदलही कशासाठी हवा?
जुनेच अजून आहे रियाजावाचून
गिळलेले आधी सारे पचायला हवे…..कधीतरी वेडयागत वागायला हवे ॥७॥
नको बघू पाठीमागे येईल कलून
कितीतरी करायचे गेले राहून
नको करू त्रागा असा उद्याच्या दारात
स्वतःलाही कधी माफ करायला हवे…..कधीतरी वेडयागत वागायला हवे ॥८॥
-संदीप खरे